जन्मदात्रीकडून दोन वर्षांच्या मुलाची विहिरीत फेकून हत्या, लातूरमध्ये धक्कादायक घटना..

147

लातूर, दि. ८ (पीसीबी) – जन्मदात्या आईने दोन वर्षांच्या लेकराला विहिरीत फेकून जीवे मारल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिने खुनाची कबुली दिल्याची माहिती आहे, मात्र तिची मानसिक अवस्था बरी नसल्याचा दावा केला जात आहे.वैरीण मातेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला विहिरीत फेकलं. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्या कोवळ्या जीवाची तडफड सुरु होती. लहानगा पाण्याबाहेर येण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. हातपाय मारुन पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. मात्र हे पाहून जन्मदात्रीच्या मनाला पाझर फुटला नाही. लेकराचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर तिचा जीव शांत झाला, अशी माहिती आहे.

आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप पिता वेंकट पांचाळ याने पत्नीवर केला आहे. माया पांचाळ असे आरोपी माऊलीचे नाव आहे. पोलिसांनी मायाला बेड्या ठोकल्या असून तिने लेकाची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
मुलाचा पिता वेंकट पांचाळ एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो काही कामानिमित्त बाहेर गेला होता. परत आल्यावर मुलगा घरी कुठेच न दिसल्यामुळे त्याने बायकोकडे चौकशी केली. तेव्हा तिने मुलाला विहिरीत फेकल्याचं सांगितलं. बायकोचं उत्तर ऐकून त्याचा पायाखालची जमीनच सरकली
त्याने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी महिलेची मानसिक स्थिती बरी नसल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं आहे. मुलाच्या हत्येनंतरही काही काळ ती विहिरीजवळच बसून होती. कुटुंबातील सदस्यांनी सांगितल्यानुसार ती आणि पती वेंकट यांच्यात अनेक वेळा लहान मोठ्या कारणांवरुन वाद विवाद व्हायचे. दाम्पत्यातील सततची भांडणं हेसुद्धा मुलाच्या हत्येमागील एक कारण असू शकतं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
माया आणि वेंकट यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती. त्यांना दोन वर्षांचा एकुलता एक मुलगा होता. हत्येच्या घटनेच्या आठ दिवस आधी माया आणि वेकट या दोघा पती-पत्नींमध्ये आपापसात मारामारी झाल्याचंही सांगितलं जातं. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.