जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना आम्ही तुरुंगात पाठवले – पंतप्रधान मोदी

454

पुणे, दि. १७ (पीसीबी) –  देशातील जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना आम्ही तुरुंगात पाठवले. जनतेला लुटणाऱ्यांची तुरुंगवारी यापुढे सुरुच राहणार आहे. जनतेचा लुटलेला प्रत्येक पैसा परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आज (गुरूवार) येथे दिला.

महायुतीच्या उमेदवारांसाठी पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर  प्रचारसभा झाली. यावेळी मोदी बोलत होते.  मोदी बोलत असताना प्रेक्षकांनी मोदी मोदीच्या घोषणा  देऊन आसंमत दणाणून सोडला. तर मोदींनी ‘कसं काय पुणेकर’ असे मराठीत  भाषणाला सुरुवात केली.

मोदी म्हणाले की, आत्ताचा भारत हा बदलेला भारत आहे. १३० कोटी भारतीय नागरिकांमुळे नव्या भारताचा विश्वास जगाला दिसत आहे.  २१ व्या शतकातील भारत हा निर्भय आहे, तो भयभीत होणारा भारत नाही.   सुरक्षा, स्वच्छता आणि वेग या तिन्ही मुद्द्यांवर सरकारचे काम  सुरू  आहे. वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस आम्ही सुरु केल्या. पुण्यात मेट्रोचे काम सुरु  आहे.  पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर  निधी दिला जात आहे.

गुंतवणूक वाढविण्यासाठी विशेष प्राधान्य देणार आहोत.  ५ वर्षात आम्ही पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत. त्याचा फायदा पुण्यालाही होणार आहे. पुणे ते पंढरपूर महामार्ग उभारला जाणार आहे,  अशीही घोषणा त्यांनी केली. काही लोकांना आमच्या विरोधात बोलल्याशिवाय चैन पडत नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

गेल्या सत्तर वर्षांपासून कलम ३७० हटविण्याचे कोणी धाडस केले नाही. केवळ थापा मारल्या, पण जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भविष्यासाठी  ३७० आम्ही हटवले. त्यामुळेच सगळ्या जगात भारताचा डंका वाजत आहे. आता जम्मू काश्मीरच्या विकासातील अडथळा  दूर झाला आहे, असे मोदी यांनी   सांगितले.