जगातील सर्वात लांब नखे असलेल्या पुण्याच्या विक्रमवीराने ६६ वर्षांनी नखे कापली

101

पुणे, दि,१३ (पीसीबी) – जगातील सर्वात लांब नखे असलेल्या पुण्यातील विक्रमवीराने अखेर बोटांना नेलकटर लावले. ८२ वर्षीय श्रीधर चिल्लाल यांनी तब्बल ६६ वर्षांनंतर आपली नखे कापली आहेत. चिल्लाल यांच्या नखाचे जतन ‘रिप्लेज, बिलिव्ह इट ऑर नॉट’या अमेरिकेतील संग्रहालयात करण्यात येत आहे.

श्रीधर यांच्या वाढलेल्या नखांची लांबी थोडी-थोडकी नव्हे, तर ३१ फूट इतकी आहे. म्हणजेच श्रीधर चिल्लाल यांच्या नखांची लांबी साधारण तीन मजली उंच इमारतीइतकी झाली होती.

श्रीधर यांनी वयाच्या १६ व्या वर्षांपासून नखे वाढवायला सुरुवात केली होती. डाव्या हाताची नखे त्यांनी इतक्या वर्षांत कापली नाहीत, तर उजव्या हाताची नखे ते नियमितपणे कापत होते. दुर्दैवाने या विक्रमामुळे त्यांच्या हाताला कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. त्यांना आपल्या डाव्या हाताची मुठ उघडता येत नाही.

वयोमानानुसार श्रीधर यांना नखांची निगा राखणे कठीण जात होते. झोपतानाही त्यांना नखामुळे अडथळा येत असे. वाऱ्यांची साधी झुळूकही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असे.