जगातील सर्वात तरूण पंतप्रधान लग्नाच्या बेडीत अडकणार …

201

नवी दिल्ली, दि.०७ (पीसीबी) : सर्वात तरूण पंतप्रधान अशी ओळख असलेल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. टीव्ही निवेदक असलेल्या बॅायफ्रेंड क्लार्क गेफोर्ड यांच्याशी त्या लग्न करणार आहेत. जेसिंडा यांना दोन वर्षांची मुलगीही आहे. पंतप्रधान असताना त्या गर्भवती होत्या. जेसिंडा अर्डर्न यांनी २०१७ मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांना सर्वात तरूण पंतप्रधान म्हणून मान मिळाला. सध्या त्या ४० वर्षांच्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून जेसिंडा व क्लार्क हे रिलेशनशीपमध्ये आहेत. २०१९ मध्ये जेसिंडा यांनी मुलीला जन्म दिला. पंतप्रधान पदी असताना गर्भवती असलेल्या त्या दुसऱ्या पंतप्रधान ठरल्या. आता मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

एका रेडिओ शोमध्ये जेसिंडा यांनीच लग्नाची घोषणा करून टाकली. त्या म्हणाल्या, अनेक वर्षांपासूनचा मित्र असलेल्या क्लार्क गेफोर्डशी लग्न करणार आहे. त्याची तयारी सुरू केली आहे. अखेर आम्हाला लग्नाची तारीख मिळाली आहे. लग्न अत्यंत साधेपणाने करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
न्यूझीलंडमध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत उन्हाळा असतो. याच काळात लग्न करण्याचे त्यांचे नियोजन आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आता न्यूझीलंडमध्ये या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. क्लार्क यांनी घरी राहून त्यांच्या मुलीचा सांभाळ केला आहे. जेसिंडा या आपल्या मुलीला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही घेऊन गेल्या आहेत. त्यामुळे तेव्हापासूनच त्या चर्चेत आल्या होत्या.

WhatsAppShare