जंटलमन राहुल द्रविडचा आयसीसीकडून सन्मान, हॉल ऑफ फेम मध्ये समावेश

60

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि ‘द वॉल’ असे बिरुद मिरवणाऱ्या राहुल द्रविडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयसीसीकडून राहुल द्रविडचा हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. राहुल हा आयसीसीच्या मानाच्या यादीत सहभागी होणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी भारताच्या बिशनसिंह बेदी, कपिल देव, सुनील गावसकर आणि अनिल कुंबळे या खेळाडूंना आयसीसीच्या हॉल ऑफ फेम या यादीत स्थान मिळाले आहे. द्रविडसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग आणि इंग्लंडचे ज्येष्ठ फलंदाज क्लेरी टेलर यांनाही आयसीसीच्या यादीत मानाचे स्थान मिळाले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये द्रविड १३ हजार २८८ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये द्रविडच्या पुढे अनुक्रमे सचिन तेंडुलकर, रिकी पाँटींग आणि जॅक कॅलिज हे खेळाडू आहेत. या बातमीनंतर सध्या भारत अ संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या राहुल द्रविडने एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून आयसीसीचे आभार मानले आहेत. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत परिवाराने दिलेल्या साथीच्या जोरावर मी हा पल्ला गाठू शकल्याचंही द्रविडने आवर्जून नमूद केले.