छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वसा घेण्याची गरज – उपमहापौर शैलजा मोरे

60

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा व कार्यांचा वसा घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत उपमहापौर शैलजा मोरे यांनी सोमवारी (दि. २६) व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी चिंचवड, संभाजी नगर येथील साई उद्यानात आयोजित प्रबोधन पर्वाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसेविका मंगला कदम, शर्मिला बाबर, प्रियांका बारसे, नगरसेवक तुषार हिंगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, अमित गोरखे, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, शाहीर प्रकाश ढवळे, नामदेव शिंत्रे, मिलिंद वेल्हाळ, जगदीश परीट, सुनील पाटील, महादेव बुजरे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधीया विषयावर सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या असंख्य अभ्यासक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच सध्या कुठला शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडेल याबाबत त्यांचे मत त्यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड भागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पुण्यापेक्षा स्थानिक महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्यांचे येण्याजाण्याच्या वेळेत बचत होईल. पालकांनी विद्यार्थ्यांचा कल व आवड लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले यांनी केले. प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी आभार मानले.