“छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला”; शिवसेना भुजबळांविरोधात हायकोर्टात

66

नाशिक, दि.२४ (पीसीबी) : महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

आमदार कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात ऐन बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता त्याचा पुढचा अंक थेट कोर्टात पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे 11 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी हा दौरा वादळी ठरला. कारण छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांची जोरदार खडाजंगी झाली. तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या समोर भर बैठकीत आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणिआमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाल. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी दिली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असं सांगितलं होतं. मात्र नळावरच्या भांडणाप्रमाणे दोघांची बाचाबाची सुरु होती.

WhatsAppShare