चौकात उभे राहण्याची लायकी नाही; नगरसेवक होण्याची स्वप्ने कसली बघता ? – महादेव जानकर   

1105

नाशिक, दि.२५ (पीसीबी) – चौकात उभे राहण्याची लायकी नसताना काही जण नगरसेवक होण्याची स्वप्न बघत आहेत, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध मंत्री महादेव जानकार यांनी केली.

नाशिक येथील सिडकोतील सुरेशा प्लाझा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या मेळाव्याला कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुका सदस्यांची गैरहजेरी होती. त्यामुळे संतापलेल्या जानकर यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासमोर गैरहजर राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी जानकर म्हणाले की, चौकात साधी पक्षाची शाखा नसताना नगरसेवक व्हायला निघाले आहेत. तुमच्याकडून पक्षवाढीची काय अपेक्षा करायची ? पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला जिल्हा कार्यकारिणीच गैरहजर राहत असेल तर दिल्ली तर लांब आहे. आपली चौकात उभी राहण्याची लायकी नसताना  नगरसेवक होण्याची स्वप्न कसला बघता ? असा संतप्त सवाल करून  जानकर म्हणाले, मी ब्रह्मचारी माणूस आहे, मला फसवू नका. बेकार शाप लागेल.