चोर समजून आठ जणांना बेदम मारहाण; दोघांचा जागीच मृत्यू

244

औरंगाबाद, दि. ८ (पीसीबी) – रात्रीच्या अंधारात चोर समजून जमावाने आठ जणांना लाठी-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.७) रात्री उशीरा वैजापूर तालुक्यात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या ग्रामीण भागात चोर समजून नागरिकांनी काही संशयितांना बेदम मारहाण केली. यामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. ही मारहाण इतकी गंभीर होती की, त्यांना बोलता सुद्धा येत नव्हते. पोलिसांनी मारहाण झालेल्या ८ जणांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यातील २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वैजापूर पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून चोरांच्या अफवा पसरल्या होत्या. वेगवेगळ्या गावात चोर आल्याच्या अफवा पसरवून नागरिक रात्रभर पहारा देत गावभर फिरत होते. या अफवा सोशल मीडियातून संपूर्ण तालुक्यात पसरल्या होत्या. त्यामुळेच हा प्रकार घडला असावा असे बोलले जात आहे.