चोरीच्या वेगवेगळ्या अकरा घटनांमध्ये सव्वा आठ लाखांचा ऐवज चोरीला

63

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर परिसरात चोरी, जबरी चोरी आणि घरफोडीच्या अकरा घटना उघडकीस आल्या आहेत. वाकड दोन, चाकण चार, एमआयडीसी भोसरी दोन, देहूरोड दोन आणि पिंपरी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्व घटनांमध्ये मोबाईल, दुचाकी, टॉवरमधील बॅटरी, सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि कंपनीमधील मटेरियल असा एकूण आठ लाख 19 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. वाकड परिसरातून 50 हजारांचे चार मोबाईल फोन चोरीला गेले. पहिल्या प्रकरणात बाळासाहेब रावसाहेब मुंडे (वय 38, रा. कल्याण) तर दुस-या प्रकरणात सफी हुसेन शेख (वय 23, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

चाकण पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्यात तीन दुचाकी चोरीचे तर एक घरफोडीचा गुन्हा आहे. तीन दुचाकी, सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण तीन लाख 40 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. जाकीर सदर अली सय्यद (वय 30, रा. चाकण), शहादत इस्माईल अन्सारी (वय 36, रा. चाकण), ललित अंकुश सकुंडे (वय 31, रा. चिखली) यांनी दुचाकी चोरीबाबत तर एका महिलेने घरफोडी बाबत फिर्याद दिली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात वाहन चोरी आणि जबरी चोरी असे दोन गुन्हे दाखल आहेत. पंकज गणेश पाटील (वय 27, रा. मोशी) यांची 20 हजारांची दुचाकी चोरीला गेली. दुसऱ्या प्रकरणात एका महिलेने फिर्याद दिली असून फिर्यादी महिला श्वानाला फिरवत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातून 55 हजारांचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरून नेली.

देहूरोड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पहिल्या प्रकरणात मोबाईल टॉवरच्या 80 हजारांच्या बॅटरी आणि दुसऱ्या प्रकरणात दोन लाख रुपयांचे कंपनीतील मटेरियल चोरून नेले आहे. वैभव दत्तात्रय पंडित (वय 37, रा. पिंपळे गुरव) आणि आशितोष चंद्रकांत आलभर (वय 28, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात घरफोडीचा एक गुन्हा दाखल आहे. दीपक किसन अगरवाल (वय 34, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून अगरवाल यांचे साई चौक पिंपरी येथे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. ते दुकान फोडून चोरट्यांनी रिपेअरिंगसाठी आलेले जुने मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

WhatsAppShare