चेन्न्ईपाठोपाठ दिल्लीमधूनही आयपीएल सामन्यांची गच्छंती

39

अकराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज पाठोपाठ दिल्ली डेअरडेविल्स संघाचे घरच्या मैदानावरचे सामने फिरोजशहा कोटला मैदानाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूत कावेरी पाणीवाटपावरुन बिघडलेली परिस्थिती लक्षात घेत गव्हर्निंग काऊन्सिलने चेन्नईचे सामने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

फिरोजशहा कोटला मैदानातील आर.पी. मेहरा ब्लॉक क्षेत्रात थेट प्रक्षेपणासाठी टेलिव्हीजन कॅमेरे लावण्यात येतात. याचसोबत या भागात २ हजार लोकं क्रिकेट सामन्याचा आस्वाद घेऊ शकतात. मात्र कोटला मैदानातला हा भाग अनधिकृत बांधकामांमध्ये मोडत असल्याने दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्ली हायकोर्ट कोटला मैदानातील सामन्यांना आक्षेप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने हा आक्षेप घेतल्यास सामन्यांच्या प्रसारणात मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे.

दिल्ली हायकोर्टात, डीडीसीएच्या प्रलंबित खटल्याची सुनावणी येत्या १८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत न्यायालय सकारात्मक निर्णय देईल अशी आशा आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्ली डेअरडेविल्सच्या फिरोजशहा कोटला मैदानातील सामन्यांचे भवितव्य न्यायालयाच्या हातात असणार हे आता स्पष्ट झालेय.