चीनला चोख उत्तर दिले, अमेरिकेची भारताला शाब्बासकी

58

नवी दिल्ली दि. ९ (पीसीबी) – चीनच्या आक्रमकतेला भारतानं सर्वोत्तम उत्तर दिल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं. “क्षेत्रीय वादावरून चिथावण्याकडे चीनचा अधिक कल आहे आणि जगाने त्यांना हे कृत्य करू देऊ नये. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी मी (चीनच्या आक्रमक कारवायांबद्दल) अनेकदा संपर्क साधला आहे. चीनकडून अनेकदा आक्रमक कारवाया करण्यात आल्या. परंतु भारतानंही त्यांना सर्वोत्तम उत्तर दिलं,” असं मत पॉम्पिओ यांनी व्यक्त केलं.

“चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आक्रमक वृत्तीच्या विशेष घटनेकडे स्वतंत्रपणे पाहणं शक्य होईल असं मला वाटत नाही. याकडे सर्वांनी व्यापक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे,” असंही पॉम्पिओ यावेळी म्हणाले. ग्लोबल एनवॉयरमेंटर फॅसिलिटच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही भूतानच्या अभयारण्यावरही चीननं आपला दावा केला होता. “हिमालयातील पर्वतरांगापासून व्हिएतनामच्या विशेष क्षेत्रातील वॉटर झोन आणि द्वीपसमुहांपर्यंत चीनची क्षेत्रीय वादांना चिथावणी देण्याची प्रवृत्ती आहे. जगाने त्यांच्या या दादागिरीचे प्रयत्न करू देऊ नये. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या अशा वाढत्या प्रयत्नांना जगाला एकत्रितपणे उत्तर द्यावं लागेल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील हे अतिशय गांभीर्यानं घेतल्याचेही ते म्हणाले.

लडाखमधील चीननं केलेल्या घुसखोरीवर पॉम्पिओ यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी लडाखमध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनीही योग्य कारवाई करत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं.

WhatsAppShare