चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ

106

बिजिंग, दि.२०(पीसीबी) – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. परदेशांमध्ये जिनपिंग यांच्या दौऱ्यांची कमी झालेली संख्या हे या चर्चेमागील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जिनपिंग हे प्रत्यक्षात कोणत्याही नेत्याला भेटण्याच्या स्थितीत नसल्याचा दावाही केला जात आहे. मात्र दाव्याबद्दल मतमतांतरे असल्याने जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील गूढ कायम आहे.

६०० दिवसांमध्ये एकही परदेश दौरा नाही –
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी मागील ६०० दिवसांमध्ये एकही परराष्ट्र दौरा केलेला नाही. २०२० साली जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी आपला शेवटचा परराष्ट्र दौरा केलेला. त्यावेळी जिनपिंग हे म्यानमार दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर जिनपिंग हे परदेश दौऱ्यावर गेले नाहीत. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी तिबेटमध्ये दौरा केला होता. कोणत्याही चिनी राष्ट्राध्यक्षांनी केलेला हा पहिला तिबेट दौरा ठरला होता. तिबेटवर चीन हक्क सांगत असल्याने त्यांचा तिबेट दौरा हा परदेश दौरा म्हणता येणार नाही, असं चिनी प्रसार माध्यमत सांगतात. जिनपिंग हे ६८ वर्षांचे आहेत. ‘युएस टुडे’च्या वृत्तानुसार सध्या जिनपिंग कोणत्याही इतर देशांच्या नेत्यांना प्रत्यक्षात भेट टाळताना दिसत आहे. चीनमध्ये सध्या वेगवेगळ्या कारणांसाठी जाणारे परदेशातील नेत्यांच्या भेटीगाठीही जिनपिंग घेत नाहीयत. मुळात चीन या नेत्यांचे दौरे आयोजित करतानाच त्यात जिनपिंग यांच्या भेटीचे कार्यक्रम आयोजित करत नाही किंवा त्यासाठी टाळाटाळ करताना दिसतोय. कोणत्याही देशाचे नेते आले तरी ते राजधानी बीजिंग वगळता इतर शहरांमध्ये जात असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे हे नेते दौराच दुसऱ्याच शहरात असल्याने जिनपिंग यांना भेटत नाहीत. अगदीच आवश्यक असल्यास परदेशातील नेते चीनमध्ये जाऊन परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेताना दिसत आहेत.

जिनपिंग यांनी मार्च २०१९ मध्ये केलेल्या इटली, मोनक्को, फ्रान्स या देशांच्या दौऱ्यांचा उल्लेख करण्यात आलाय. या वेळी जिनपिंग यांना देण्यात आलेल्या गार्ड ऑफ ऑनरदरम्यान ते योग्य पद्धतीने चालत नसल्याचं, त्यांना चालताना त्रास होत असल्याचं दिसून आलेलं. तसेच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षासोबत चर्चा करताना खुर्चीवर बसतानाही त्यांना फार त्रास होत असल्याचं कॅमेरांनी टापलं होतं. खुर्चीवर बसतानाही जिनपिंग यांनी आधार घेतल्याचा उल्लेख अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये आहे.

बैठकींना व्हर्चुअल हजेरी..
जिनपिंग यांना आरोग्यासंदर्भातील समस्या असल्यानेच ते जास्तीत जास्त नेत्यांची फोनवरुनच संवाद साधतात, असं प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासहीत एकूण ६० राष्ट्राध्यक्षांसोबत मागील काही काळामध्ये फोनवरुन संवाद साधलाय. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी व्हर्चुअल माध्यमातून अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावलीय. ब्रिक्स राष्ट्रांची बैठक ९ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडली. या बैठकीलाही त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी डिजीटल माध्यमातून सहभाग नोंदवला.

शेनझेन विशेष आर्थिक झोनच्या स्थापनेच्या ४० व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजत करण्यात आलेल्या कार्यक्रमालाही जिनपिंग हे फार उशीरा आलेले. तसेच भाषण देतानाही ते नेहमीच्या उत्साहाने भाषण देण्याऐवजी तुलनेने लहान आवाजामध्ये आणि फार हळू बोलत होते. भाषणादरम्यान अनेकदा ते खोकताना आणि वारंवार पाणी पिताना दिसल्याने त्यांच्या प्रकृतीसंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. इतकचं नाही तर मागील काही आठवड्यांमध्ये चीनने जिनपिंग यांच्यासोबत अमेरिकन परराष्ट्रमंत्री, सिंगापूरचे पंतप्रधान आणि डच प्रंतप्रधानांसोबतच्या तीन महत्वाच्या बैठकी कोणतंही ठोस कारण नसताना थेट रद्द केल्याची घोषणा केलीय. या सर्व पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहे. जिनपिंग यांना एखादा गंभीर आजार तर झाला नाहीय ना?, चीन जिनपिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती लपवत आहे का?, जिनपिंग यांना नक्की काय झालं आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांबद्दल सध्या जागतिक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे. मात्र चिनी प्रसारमाध्यमांकडून या सर्व अफवा असल्याचा दावा केला जातोय. मात्र ६०० दिवसांपासून परदेश दौरा नाही, फोनवरुनच चर्चा अन् अचानक रद्द झालेल्या बैठकी या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांच्या प्रकृतीविषयी चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे.

WhatsAppShare