चिलीला झुंजवल्यानंतरही भारताचा पराभव

0
591

मनौस (ब्राझिल), दि.२९ (पीसीबी) : भारतीय महिला संघाने येथे सुरू असलेल्या चार देशांच्या फुटबॉल स्पर्धेत आपल्या दुसऱ्या सामन्यात चिलीला झुंजवले. त्यानंतरही भारताला ०-३ असा पराभव पत्करानवा लागला. आक्रमक मारिया उरुटिया (१४वे मिनिट) हिने झटपट चिलीला खाते उघडून दिले. पण, त्यानंतर गोल करण्यासाठी त्यांना अखेरच्या मिनिटांची वाट बघावी लागली. सामन्याच्या या अखेरच्या मिनिटांत मात्र लागोपाठच्या मिनिटाला दोन गोल नोंदवत चिलीने विजय साकारला. पहिला गोल ८४, तर दुसरा गोल ८५व्या मिनिटाला झाला.

भारताने आज संघात तीन बदल केले. एम. लिटोईनगाम्बी देवी, मार्टिना थॉकचोम आणि मनिषा पन्ना यांना स्थान दिले. सामन्याच्या सहाव्याच मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती. ब्राझीलविरुद्ध गोल करणाऱ्या मनिषा कल्याण हिला ही संधी साधता आली नाही. तिची कॉर्नर किक थेट चिली गोलरक्षकाच्या हातात गेली.

ही सुरवातीची संधी वगळता भारतीय खेळाडूंना गोल करण्याच्या फारशा संधी मिळाली नाही. चिलीने मात्र सामन्यावर पू्ण नियंत्रण राखताना भारतीय मुलींवर दडपण आणले. सामन्याच्या १२व्या मिनिटाला त्यांची संधी हुकली. पण, दोनच मिनिटांनी मिळालेली संधी त्यांनी साधली. रोजासच्या चालीला उरुटियाने पूर्णत्वाला नेले. त्यानंतर गोल करण्याच्या फारशा संधी निर्माण झाल्या नाहीत .

उत्तरार्धात मात्र भारताला एक चांगली संधी निर्माण झाली होती, सामन्याच्या ६६व्या मिनिटालां मनिषा आणि राखीव खेळाडू म्हणून आलेली दंगमेई ग्रेस यांनी सुरेख चाल रचली होती. पण, त्यांना देखिल ही चाल यशस्वी करता आली नाही. पाठोपाठ दोनच मिनिटांनी चिलीला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात मात्र चिलीने लागोपाठ दोन गोल नोंदवून विजय मिळविला. राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या इसीडोरा हर्नाडेज आणि कारेन आराया यांनी हे गोल केले. भारताचा पुढील सामना गुरुवारी व्हेनेझुएलाशी होणार आहे.