चिपळूणमध्ये घरावर दरड कोसळली; ३ जणांचा मृत्यू तर २ वर्षाच्या आरुषसाठी एनडीआरएफचं सर्च ऑपरेशन सुरु

82

रत्नागिरी, दि.२५ (पीसीबी) : मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली आहे. रत्नागिरीत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून १७ जण बेपत्ता आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे कुंभारवाडीचाही समावेश आहे. पेढे कुंभारवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत घर जमीनदोस्त झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

एनडीआऱएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा हायवेलगत असणाऱ्या घऱावर जवफपास १०० फुटांवरुन दरड कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दोन मृतदेह हाती लागले आहेत. मात्र दोन वर्षाच्या आरूषचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. आरुषचा मृतदेह मातील गाढला गेला असून तो शोधण्यासाठी एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आणि पुरामुळे गेल्या तीन ते चार दिवसांत १४५ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जखमी झाले. दरड दुर्घटना आणि पुरात बेपत्ता असलेल्या सुमारे शंभराहून अधिक नागरिकांचा शोध सुरू आहे, तर एक लाख ३५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांमधील दरड दुर्घटनांतील मृतांचा आकडा शनिवारी ७४ वर पोहोचला. दरडी कोसळल्याने रायगडमध्ये ५३, रत्नागिरी जिल्ह्यात तीन आणि सातारा जिल्ह्यात १८ जणांचा बळी गेला. रायगड जिल्ह्यात ४३, रत्नागिरी जिल्ह्यात १७ आणि साताऱ्यातील २२ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

धुवाधार पावसामुळे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये येथे गुुरुवारी संध्याकाळी दरड कोसळली. त्यातील मृतांची संख्या शनिवारी ४२ वर पोहोचली, तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे ५ आणि साखर सुतारवाडी येथे ६ जण दगावले आहेत. तळये गावातील ४३ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके त्यांचा शोध घेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पोसरे गावात शुक्रवारी कोसळलेल्या दरडीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर १७ बेपत्ता आहेत. तेथील सात घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. दरम्यान, कोकणात १६ जुलैपासून अतिवृष्टीमुळे १२५ जणांचा मृत्यू, तर ५६ नागरिक जखमी झाले आहेत, तर बेपत्ता असलेल्या ६४ नागरिकांचा शोध सुरू असल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या १२ दुर्घटना घडल्या. त्यांतील १८ मृतदेह शनिवारी ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई येथे शुक्रवारी रात्री १२ ठिकाणी डोंगरकडे कोसळून अनेक घरे गाडली गेली. त्यांतील २२ नागरिक बेपत्ता आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन हजारांहून अधिक पाळीव जनावरांचा मृत्यू झाला.

WhatsAppShare