चिखली पोलीस ठाण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन   

199

चिखली, दि. १० (पीसीबी) – गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा, प्रस्ताव आणि मंजुरी यामध्ये घुटमळत असलेले चिखली पोलीस ठाण्याचे पुण्याचे  पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते आज (बुधवार)  उद्घाटन करण्यात आले. पोलीस ठाणे सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी महापौर राहुल जाधव, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या जुन्या इमारतीतील तात्पुरत्या जागेत चिखली पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. चिखली, कुदळवाडीचा परिसर पुणे ग्रामीण पोलिसांकडे देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा परिसर शहर पोलिसांकडील निगडी ठाण्याला जोडण्यात आला होता. यामुळे निगडी पोलिस ठाण्याची हद्द मोठी झाली होती.  तसेच या परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत होते. चिखलीतील घरकुल गुन्हेगारी कारवायांमध्ये हिटलिस्टवर आहे. त्यामुळे चिखली पोलीस ठाणे लवकरात लवकर कार्यन्वित करण्याची मागणी नागरिकांतून होत होती.

सध्या चिखली पोलिस ठाण्यासाठी दोन निरीक्षक, सात अधिकारी आणि १०० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये वरिष्ठ निरीक्षक म्हणून डॉ.विवेक मुगळीकर आणि निरीक्षक म्हणून शंकर अवताडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  येत्या काळात चिखली परिसरातील  गुन्हेगारी कारवाया रोखण्यात पोलिसांना यश येणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.