चिखली परिसरात आक्या उर्फ ‘बॉण्ड’ ची दहशत; एका दिवसात तिघांवर चाकूने वार

4988

निगडी, दि. ३ (पीसीबी) – युवतीचे अपहरण, मारहाण आणि लुटमार या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांप्रकरणी नुकताच बालसुधार गृहातून शिक्षा भोगून बाहेर आलेला अल्पवयीन आरोपी आक्या उर्फ बॉण्ड उर्फ सुमित पांडुरंग मोहोळ (वय १७, रा. घरकुल चिखली) याने घरकुल चिखली, तळवडे परिसरात एकाच दिवसात तिघांवर चाकूने वार करुन धुमाकुळ घातला आहे.

पहिल्या घटनेत आक्याने घरकुल चौकातलगतच्या दत्तगुरु या टपरीवर चहा पित असलेल्या आदम शब्बीर चौधरी (वय ३३, रा. जाधववाडी, चिखली) यांच्यावर फक्त धक्का लागल्याचा जाब विचारला म्हणून चाकूने वार केले. दुसऱ्या घटनेत तळवडे येथील सागर चौधरी याच्या अंडाभुर्जीच्या गाडीवर उभा असलेला त्याचा मित्र नीलेश वाघमारे याच्या पोटावर विनाकारण चाकूने वार करुन जखमी केले. तर तिसऱ्या घटनेत चिखली येथे घरी निघालेल्या सतीश गाडे या तरुणाची दुचाकी भर रस्त्यात अडवून त्याने आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मिळून सतीशवर चाकूने वार करुन सतीश जवळील ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने हिस्कावून नेले.

आक्या हा अल्पवयीन असला तरी त्याने केलेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. तसेच दिवसेंदिवस तो गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत आहे. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आज (सोमवार) निगडी पोलिसांनी त्याला अटक केली होते. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून टाके असल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. उपचार पूर्ण होताच त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी दिली आहे.