चिखलीत मीक्सर मशीनखाली सापडून कामगाराचा मृत्यू

111

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – टेम्पोच्या मागे जोडलेली सिमेंट काँक्रीट मीक्सर मशीनचे चाक अंगावरुन गेल्याने एका बांधकाम कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना साने चौक, आकुर्डी-चिखली रस्त्यावर घडली.

अल्लाउद्दीन बागवान (वय ४२, रा. मोरयानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ अब्बास सलीन हुसेनसाहब बागवान (वय ३१, रा. मोरयानगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पोचालक दौलत मेहबुब बागवान (रा. मोरयानगर झोपडपट्टी, चिंचवड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.२ जुलै) सकाळी पावणेदहाच्या सुमारास साने चौक, आकुर्डी-चिखली रस्त्यावर मयत अल्लाउद्दीन हा टेम्पो (क्र.एमएच/१४/ईएम/७३३०) ला जोडलेल्या मीक्सर मशीनच्या पाठीमागे रशी धरुन उभा होता. यावेळी टेम्पोचालक दौलत याने अचानक टेम्पो मागे घेतला. यावेळी मीक्सर मशीचे चाक अल्लाउद्दीन याच्या अंगावरुन गेल्याने गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. आरोपी टेम्पोचालक दौलत याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक यु.बी.ओमासे तपास करत आहेत.