चिखलीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांच्या टोळीला पोलिसांनी घेतले ताब्यात

102

चिखली, दि. १७ (पीसीबी) – मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांच्या टोळीला १ लाख ६ हजार १५० रुपयांचा ऐवजासह चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १६) पहाटेच्या सुमारास पूर्णानगर चिखली येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूर्णानगर चिखली येथे पाच संशयित मुले उभी असून ही मुले श्रीदत्त मोबाईल शॉपी या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती चिखली पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. यावर पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता, कटावणी, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायवर, नायलॉनची रस्सी, पेनरिलीफ स्प्रे, पाच मंकी मास्क, सॅग बॅग तसेच होंडा अॅक्टिव्हा (एम एच १४ / जी डब्ल्यू ४०८५), होंडा शाईन (एम एच १४ / डी बी ७६५२), हिरो होंडा (एमएच १४ / यु ३२९२) या तीन दुचाकी असा एकूण १ लाख ६ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल चोरीच्या असून एक मोटारसायकल पिंपरी आणि दोन मोटारसायकल चिंचवड पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आहेत. यामुळे चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.