चिखलीत टोळक्यांनी पोलिस शिपायाचा मोबाईल फोडून केली धक्काबुक्की; चौघांना अटक

448

भोसरी, दि. २६ (पीसीबी) –  रात्री उशीरा स्पीकर लावून जोरजोराने आरडा ओरड करुन धिंगाना घालणाऱ्या टोळक्यांना स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने एका पोलिस शिपाईयाचा मोबाईल फोडून त्याला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२५) चिखलीतील सर्वे नं.१६, शिवाजीनगर येथे असलेल्या राठी हॉटेलमध्ये घडली.

अशोक ठकावरे असे धक्काबुक्की झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निगडी पोलिसांनी इमामुदीन तय्यबअली इनामदार (वय २०), मोहम्मद सईद तय्यबअली इनामदार (वय २४, दोघेही.रा. जनता शाळेजवळ, दौंड), योगेश रमेश माने (वय २४, रा. गौतमनगर, दौंड), विकास पांडुरंग डाळींबे (वय २५, रा. जगदाळे वस्ती बारामती आऊटर दौंड) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री निगडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई अशोक ठकावरे हे रात्र पाळीला होते. यावेळी रात्री तिनच्या सुमारास चिखलीतील सर्वे नं.१६, शिवाजीनगर येथे असलेल्या राठी हॉटेलमध्ये काही टवाळखोर स्पीकर लावून जोरजोराने आरडा ओरड करुन धिंगाना घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर ठकावरे हे त्यांचे सहकारी पोलिस शिपाई गेंगजे यांना घेऊन तेथे पोहचले. ठकावरे यांनी तेथील मुलांना स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितला मात्र तेथे उपस्थित काही टोळक्यांनी तु कोण रे, तुझा संबंध काय असे बोलुन ठकावरे आणि त्यांचे सहकारी गेंगजे यांना शिवीगाळ केली. तसेच ठकावरे यांचा गणवेश ओडून त्यांच्याशी धक्काबुक्की केली व त्यांच्या जवळील मोबाईल हिस्कावून भिंतीवर फोडून त्याचे नुकसान केले. यामुळे संबंधीत चारही आरोपींना निगडी पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणने आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस.डब्ल्यु.वाघमारे तपास करत आहेत.