चिखलीतील ‘त्या’ मजूराचा खुन अनैतिक संबंधातून; महिलेसह दोघांना अटक

2619

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – चिखलीतील शेलारवस्तीमध्ये असलेल्या दगडखाणीत शुक्रवारी (दि. १०) दगडाने ठेचून एका मजूराचा खुन करण्यात आला होता. या खुनाचे गुढ उलगडण्यात निगडी पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.

विजय प्रल्हाद सोळंकी (वय ४०, रा. भांगरे कॉलनी, चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका २५ वर्षीय महिला, धन पठाणी कामी (वय ४२, रा. सोनवणे वस्ती, चिखली) आणि खेमराज राणा कामी (वय २५, रा. चिखली) या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विजय हा चिखलीत राहत होता. तसेच बांधकाम साईटवर मोलमजुरीचे काम करत होता. या ठिकाणी त्याने आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध प्रस्थापीत केले होते. तो त्या महिलेला त्रास देत होता. यामुळे आरोपी महिला आणि तिचा मित्र धन कामी यांनी मिळून शुक्रवारी (दि. १०) दगड खाणी जवळ नेऊन विजयचा दगडाने ठेचून खुन केला.

ह्या खुनाचा उलगडा वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, संदीप पाटील आणि जाधव यांच्या पथकाने केला.