चिखलीतील ‘त्या’ मजुराचा दगडाने ठेचून खुन केल्याचे उघड

179

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – चिखलीतील शेलारवस्ती येथील शुक्रवारी (दि. १०) दगडखाणीमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गुढ उलगडले आहे. तरूणाच्या डोक्यावर दगडाने ठेचून खुन केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विजय प्रल्हाद सोळंकी (वय ४०, रा. भांगरे कॉलनी, चिखली) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. मात्र, अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हे चिखलीत राहत असून बांधकाम साईटवर मोलमजुरीचे काम करत होते. शुक्रवारी (दि. १०) सकाळी ते घरातून बाहेर गेले होते. मात्र परत आलेच नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास दगड खाणी जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात नेण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. निगडी पोलिस तपास करत आहेत.