‘चिखलफेक’ आंदोलन प्रकरणी बाळासाहेब ठाकरेंनी नक्कीच माझे कौतुक केले असते- नितेश राणे

130

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – चिखलफेक आंदोलन केल्याबद्दल माझ्यावर टीका होते आहे. हे आंदोलन कुणाला आवडो किंवा न आवडो बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना हे आंदोलन नक्कीच आवडले असते असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे. उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना अटक करण्यात आली होती. जामिनावर त्यांची बुधवारी सुटका करण्यात आली. सुटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केले आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी माझे कौतुक केले असते. शाब्बास नितेश तू केलेस ते चांगले केलेस असे ते म्हटले असते असेही नितेश राणेंनी स्पष्ट केले. नितेश राणे यांना दर रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. त्यावर विचारले असता, बरे झाले दर रविवारी कणकवलीत यायला मिळेल. न्यायलयाने माझा प्रचार सोपा केला अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे. दरम्यान नितेश राणे त्यांची भूमिका फेसबुक लाइव्ह करून मांडणार आहेत. त्यासंदर्भातले ट्विटही त्यांनी केले आहे.

नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना चिखलफेक प्रकरणात ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्यांना ९ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर नितेश राणे यांनी स्वतःच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला या आंदोलनाबद्दल शाबसकीच दिली असती असेही ते म्हटले आहेत. आम्हाला शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. आंदोलन केले ते योग्यच झाले अशी जुन्या शिवसैनिकांचीही भावना होती. आंदोलनानंतर आता रस्ता तयार करण्यास सुरूवात झाली आहे असेही त्यांनी सांगितले.