चिंता नको! संपत्ती जप्त झाली तरी मी बेघर होणार नाही- विजय मल्ल्या

21

नवी दिल्ली. दि. ९ (पीसीबी) – फरार उद्योगपती विजय मल्ल्याने त्याची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्याची कारवाईमध्ये कोर्टाच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे. या जप्तीतून फार काही हाती लागेल असे वाटत नाही कारण तो सध्या ब्रिटनमधल्या ज्या आलिशान बंगल्यामध्ये राहतोय ते घर त्याच्या नावावर नाहीय. भारतीय बँकांचे नऊ हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनला पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील कोर्टात खटला सुरु आहे. भारतीय बँकांनी त्याच्या दिवाळखोरीत गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज दिले होते.
मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधीच्या खटल्यावर सप्टेंबरपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. ब्रिटीश फॉर्म्युला वन ग्रँण्ड प्रिक्सच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना मल्ल्याने सांगितले कि, ब्रिटनमध्ये माझ्या नावावर जी संपत्ती आहे ती मी कोर्टाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देईन. पण कंट्री रेसीडन्स हे आलिशान घर माझ्या मुलांच्या नावावर असून लंडनमधील घर आईच्या नावावर आहे. यूकेमधल्या माझ्या संपत्तीसंदर्भात कोर्टात मी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
काही गाडया, काही दागिने माझ्याजवळ आहेत. ते जप्त करण्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यायची गरज नाही. मी स्वत:हूनच ते तुम्हाला आणून देईन. फक्त तुम्ही मला फक्त तारीख, वेळ आणि ठिकाण सांगा असे मल्ल्या म्हणाला. माझ्या नावावर जी संपत्ती आहे ती ताब्यात घेऊ शकतात पण त्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही असे त्याने सांगितले. विजय मल्ल्या मार्च २०१६ पासून ब्रिटनमध्ये आहे. मी आधीपासून इंग्लंडचा रहिवाशी आहे. भारतामध्ये मी एनआरआय होतो. त्यामुळे पळून जाण्याचा प्रश्न येतोच कुठे ? असा उलट सवाल त्याने केला. भारतात आता निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे मला परत आणून लटकवायचे आहे जेणेकरुन जास्तीत जास्त मते मिळवता येतील असे मल्ल्या म्हणाला.