चिंचवड स्टेशन परिसरातून तडीपार गुंडाला दोन गावठी पिस्टल आणि तीन काडतुसांसह अटक

823

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुंडाला चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरातून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने केली.   

चेतन रामलाल कुशवाह (वय २८, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर नाशिक, भोसरी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाला त्यांच्या खबऱ्याकडून नाशिक मधील सिन्नर  पोलीस ठाण्यातील फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी चेतन कुशवाह हा चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून चेतन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.  पोलिसांनी ते जप्त केले असून चेतनवर  गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पोलीस नाईक स्वप्निल शेलार, विजयकुमार आखाडे, राजेंद्र सिरसाठ, पोलीस शिपाई गोविंद डोके, पंकज भदाने, अमोल माने, महिला पोलीस नाईक वंदना गायकवाड यांच्या पथकाने केली.