चिंचवड रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी वाचवले वृध्दाचे प्राण

77

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) –  तोल जाऊन रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडलेल्या एका ६० वर्षीय वृध्दाला तातडीने बाहेर काढून चिंचवड लोहमार्ग पोलिसांनी जीवदान दिले आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारी चारच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्टेशन येथे घडली.

परेश कांतीलाल देसाई (वय ६०, रा. कांदिवली, मुंबई) असे बचावण्यात आलेल्या वृधाचे नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील मुलाला भेटून लोणावळ्याला जाणारी लोकल पडकताना परेश देसाई यांचा तोल गेल्याने ते चिंचवड रेल्वे स्थानकावरील रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडले होते. यावेळी प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी तातडीने देसाई यांना सुखरुप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले. यामुळे मोठा अनर्थ टळला.  जीव वाचवणारे लोहमार्ग पोलिस पुरुषोत्तम कर्दाळे, पोलीस नाईक बागुल आणि शेलार यांचे वृध्द देसाई यांनी आभार मानले.