चिंचवड येथून तडीपार चोरट्याला तिघा साथीदारांसह अटक; चार दुकानफोड्या उघड अडीच लाखांचा ऐवज जप्त

157

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – एका तडीपार सराईत चोरट्याने तडीपारीच्या काळात आपल्या तिघा साथीदारांसोबत मिळून बिजलीनगर येथील दोन, चिंचवड येथील एक तर निगडी येथील एका दुकानात चोरी केल्याचे समोर आले आहे. चिंचवड पोलिसांनी या चौघांना अटक करुन त्यांच्याकडून विविध दुकानातून चोरलेला माल आणि दोन दुचाक्या असा एकूण २ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चंद्रकांत अनंत माने (वय २५, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे तडीपार आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचे साथीदार सुर्यकांत अनंत माने (वय २३, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), अफताब अलताफ पिरजादे (वय २१, रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) आणि हुसेन रमजान बागवान (वय २३, रा. बळवंतनगर, चिंचवड) या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी स्वप्निल शेलार यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, तडीपार घरफोडी प्रकरणातील चोर हा बळवंतनगर साई समर्थ कॉलनी, चिंचवड येथील एका रुममध्ये लपून बसला आहे. यावर चिंचवड पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून आरोपी चंद्रकांत याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार सुर्यकांत माने, अफताब पिरजादे आणि हुसेन बागवान यांच्यासोबत मिळून बिजलीनगर येथील हनुमान स्विट्स आणि नारायण सुपर मार्केट. तसेच चिंचवड येथील सावन बिअर शॉपी तर निगडी येथील विशाल ड्रेसेस या कपड्याच्या दुकानात चोरी केल्याचे कबुल केले. यावर पोलिसांनी या चौघांना अटक करुन त्यांच्याकडून चोरी केलेली रोख रक्कम, बिअरचे बॉक्स, नवीन कपडे, सोन्याचे दागिने, काजु-बदाम, एक मोबाईल आणि दोन दुचाक्या असा एकूण २ लाख ५८ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला. चिंचवड पोलीस आरोपींची आजूनही कसून चौकशी करत आहेत.

ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, राजेंद्र शिरसाट, स्वप्निल शेलार, विजय आखाडे, गोविंद डोके, पंकज, भदाणे, अमोल माने आणि सचिन वर्णेकर यांच्या पथकाने केली.