चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांना अटक आणि तत्काळ सुटका; वाकड पोलिसांनी केली सेटलमेंट?

9067

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणून डांबून ठेवल्याप्रकरणी रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे, त्यांचा भाऊ राजेश दुबे आणि बिर्ला रुग्णालयातील बाऊंसरवर बुधवारी (दि.२२) वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटून गेले असताना आरोपींना अटक का करण्यात आले नाही म्हणून शहरभरातून संताप व्यक्त केला जात होता. आखेर आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास वाकड पोलिसांनी रेखा दुबे, त्यांचा भाऊ राजेश दुबे आणि आणखी एकाला अटक करुन पोलिस ठाण्यातच जामीन मंजूर करुन सोडून दिले.

पिंपरी येथील दशरथ शिवाजी आरडे या ७२ वर्षे वयाच्या वृद्धाला राहत्या घरी ६ ऑगस्ट रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे त्यांना सुरुवातीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला दाखल करताना उपचारासाठी सुरूवातीला दहा हजार रुपये भरण्यात आले. उपचारानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने दशरथ आरडे यांच्यावरील उपचारापोटी त्यांचा मुलगा संजय आरडे यांच्या हातात ८६ हजार ५८३ रुपयांचे बिल ठेवले. आरडे कुटुंबीय गरीब असल्यामुळे त्यांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपण दारिद्य्र रेषेखालील असल्याचे पुरावे रुग्णालय व्यवस्थापनाला दिले. कायद्याने आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे आदित्य बिर्ला रुग्णालयाला बंधनकारक आहे. तरीही या रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी आरडे यांना उपचाराचे संपूर्ण बिल भरावेच लागेल, असा दम दिला. वारंवार विनंती करूनही दुबे यांनी त्यांचे ऐकले नाही.

त्यामुळे संजय आरडे यांनी धर्मादाय आयुक्ताकडे धाव घेतली. धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी रेखा दुबे यांच्याशी संपर्क साधला. रुग्ण आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे पुरावे असून, रुग्णाला डिस्चार्ज देण्यास सांगितले. तसेच याबाबत वाकड पोलिसांनाही कळविण्यात आल्याने त्यांनी दुबे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुबे यांनी बुधवारी (दि. २२) सकाळी अकरा वाजेपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल, असे धर्मादाय आयुक्त व वाकड पोलिसांना आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे रुग्णाचा मुलगा संजय आरडे यांनी वाकड पोलिसांत तक्रार दिली. त्याच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (दि. २२) सायंकाळी रेखा दुबे, त्यांचा भाऊ राजेश दुबे आणि बाऊंसरवर रुग्णास इच्छेविरोधात डांबून ठेवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे तसेच सामुहिकरित्या गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्यामुळे त्यांना तत्काळ अटक होणे गरजेचे होते. परंतु, गोरगरीबांवर गुन्हा दाखल झाला की त्यांना तत्काळ अटक करणाऱ्या पोलिसांनी आदित्य बिर्ला रुग्णालयातील गर्भश्रीमंत आणि पांढरपेशातील गुन्हेगारांना अभय दिले. २४ तास झाले तरी रेखा दुबे व त्यांच्या साथीदारांना अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या हेतूबाबतच शंका उपस्थित केली जाऊ लागली. या प्रकरणात सेटलमेंट झाल्याची शहरभर जोरदार चर्चा होऊ लागली. गरीब गु्न्हेगारांना एक न्याय आणि पांढरपेशात काहीही करणाऱ्या गुन्हेगारांना अभय देणाऱ्या वाकड पोलिसांवर टिका सुरू झाली. अखेर पोलिसांनी रेखा दुबे, राजेश दुबे आणि बाऊंसर यांना शुक्रवारी अटक केली. तसेच गुन्ह्याच्या स्वरुपानुसार त्यांना पोलिस ठाण्यातच जामीन मंजूर करून सोडून देण्यात आले.

दरम्यान, आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांनी या प्रकरणात डांबून ठेवलेल्या रुग्णाला सोडावे यासाठी रुग्णाच्या मुलाला मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरच आरोप केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनीच कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आणि रुग्णाला विनापरवाना नेल्याचा कांगावा करत त्याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनीच आदित्य बिर्ला रुग्णालयात धाव घेऊन संबंधित रुग्णाची सुटका केली होती. तरीही रुग्णाला विनापरवाना नेल्याची तक्रार करून रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांनी निर्ढावलेपणाचे लक्षण दाखवून दिले आहे. उपचाराचे पैसे देत नाही म्हणून संबंधित वृद्ध रुग्णाला जेवण देणेही बंद करण्यात आले होते.

तसेच रुग्णाला नातेवाइकांनाही भेटू दिले जात नव्हते. एका वयोवृद्ध रुग्णाचे प्रचंड हाल केले. तरीही रेखा दुबे यांनी त्यांच्या सोडवणुकीसाठी मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देऊन आदित्य बिर्ला रुग्णालय रुग्णांची कशाप्रकारे प्रचंड लूट करते, याचे उत्तम उदाहरण स्वतःहून समोर आणले आहे. या सर्व प्रकारावरून रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनी आपली लूट होणार नाही ना, याची विशेष दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या रुग्णालयात कशा प्रकारे लूट होते, याची अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आले आहेत. आता या प्रकरणात थेट गुन्हा दाखल झाल्यानंतर तरी या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाते का की सेटलमेंट होऊन लुटीचा कारभार पुन्हा जैसे-थे राहतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.