चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीत खंडीत वीजपुरवठा; महिलांचा कार्यकारी अभियंत्याला घेराव

38

वाल्हेकरवाडी चिंचवडे फार्म, शेवंतीबन, चिंतामणी कॉलनी, स्वप्नशिल्प या भागातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्यामुळे महिलांना महावितरणच्या बिजलीनगर येथील कार्यालयात कार्यकारी अभियंत्याला घेराव घातला. तसेच वीजपुरवठा सुरळित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. सेवा चांगली न दिल्यास वीजबिल न भरण्याचा इशारा महिलांनी दिला.

शेवंतीबन कॉलनी, चिंतामणी कॉलनी बी, स्वप्नशिल्प कॉलनी, स्पाईन सर्व्हिस रोड येथील विविध कॉलन्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. तसेच विजेच्या कमी दाबामुळे घरातील विजेची उपकरणे जळण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. त्याचप्रमाणे या भागातील धोकादायक उघडे डीपी बॉक्स व भूमीगत विजेचे केबल बदलण्यासाठी या भागातील महिलांनी महावितरणकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी नगरसेविका करूणा चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली बिजलीनगर येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता जाधव यांना घेराव घातला. तसेच मागण्यांचे निवेदन दिले. या भागातील वीजपुरवठा सुरळित न झाल्यास विजबिलांचा भरणा न करण्याचा इशारा महिलांनी दिला. महिलांचे रौद्ररुप पाहून कार्यकारी अभियंता जाधव यांनी विजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले.