चिंचवडमध्ये ‘महापौर चषक’ बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे २८ जूनरोजी आयोजन

114

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि पिंपरी-चिंचवड अमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) महापौर चषक ५९ वी राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २८ आणि २९ जूनरोजी चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेचा शुभारंभ पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी,  सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे आदींची उपस्थिती असणार आहे.

या स्पर्धेत २७ राज्यातून महिला व पुरूष असे मिळून एकूण ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना १६ लाख ६५ हजार रूपयांची बक्षिसे आणि ट्रॉफी, मेडल्स अशी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी इंडियन बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशनचे सचिव संजय मोरे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोशिएशनचे सचिव राजेंद्र सातपूरकर, पिंपरी-चिंचवड अमेच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव राजेश सावंत यांचे सहकार्य लाभणार आहे.