चिंचवडमध्ये पोलिसांना माहिती दिल्याच्या रागातून वाहनांची तोडफोड

487

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – पोलिसांना दारु पित असल्याची माहिती दिल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्यांनी परिसरात दहशत माजवण्यासाठी चार वाहणांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी (दि. १०) रात्रीच्या सुमारास विद्यानगर चिंचवड येथे घडली.  

याप्रकरणी अमित प्रकाश बाबर (रा. मोहननगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर झोंबाडे, अभिषेक घनघाव, सुप्रीम काळे, अजय बारस्कर, दीपक गिरी (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री निगडी पोलिसांना चिंचवड येथील विद्यानगर भागात काही तरुण रस्त्यावर दारु पित बसले आहेत, अशी माहिती मिळाली होती. यावर पोलीसांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता पोलिसांना पाहूण आरोपी तेथून पळून गेले. पोलीस परतताच काही वेळाने पुन्हा आरोपी त्या परिसरात आले. परिसरातील नागरिकांनीच आपल्या विरोधात पोलीसांना माहिती दिल्याच्या संशयावरुन त्यांनी त्या परिसरात उभ्या असलेल्या एकूण चार गाड्यांची तोडफोड करुन पसार झाले. पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.