चिंचवडमध्ये पीएमपी बस प्रवासात महिलेच्या दागिन्यांवर डल्ला; सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

213

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) – पीएमपी बस प्रवासादरम्यान एका महिलेजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २५ हजार ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. ही घटना शनिवारी (दि.२५) सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेवाडी फाटा ते चिंचवडगावातील पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स दरम्यान घडली.

जयश्री सुनील ढमक (वय ३७, रा. थेरगाव, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जयश्री या पीएमपी बसने काळेवाडी फाटा येथून चिंचवडगावाकडे जात होत्या. त्या दुपारी साडेबाराच्या सुमारास चिंचवड गाव येथील पी.एन.गाडगीळ ज्वेलर्स दुकानाजवळ उतरल्या. उतरल्यानंतर त्यांच्या जवळील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने वाकड पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.