चिंचवडमध्ये न्युज एक्सप्रेस २४ चॅनेलच्या कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक; दोघे जखमी

322

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान दुचाकीवरुन आलेल्या दोन ते तीन अज्ञात आंदोलकांनी चिंचवड येथील न्युज एक्सप्रेस २४ या वेब न्युज चॅनलच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेकीत न्युज एक्सप्रेस २४ या वेब चॅनलचे दोन प्रतिनिधी जखमी झाले आहेत.

श्रीनिवास माने (वय ४७, रा. एम.आय.डी.सी, शाहुनगर चिंचवड) आणि त्यांचे सहकारी फरियान मुजावर (रा. चिंचवड) असे जखमी वेब चॅनलच्या प्रतिनिधींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी दुचाकीवरुन आलेल्या दोन ते तीन अनोळखी इसमांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पूर्णानगर येथील ओसीया आर्केड शॉप नं.८ येथे  न्युज एक्सप्रेस २४ या वेब न्युज चॅनलचे ऑफीस आहे. गुरुवारी (दि.९) दुपारी बाराच्या सुमारास या ठिकाणी फिर्यादी माने आणि त्यांचे सहकारी मुजावर हे दोघे त्यांच्या कार्यालयातून बंदचे वृत्तांकन करत होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन ते तीन जणांनी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करुन पसार झाले. यामुळे ऑफीसच्या काचा फुटून नुकसान झाले. तसेच माने आणि मुजावर यांच्या हाताला दगड लागल्याने ते दोघेही जखमी झाले आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर.एस.भोये तपास करत आहेत.