चिंचवडमध्ये दुकानाचे शटर उचकटून लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

315

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – दुकानाचे लॉक तोडून आणि शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या हुशारीने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दुकानातील तांदळाच्या पिशव्या, सिगारेटची पाकीट आणि रोख रक्कम ४१२०० असा एकूण १ लाख ६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही चोरी शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि.२५) सकाळी साडेसातच्या दरम्यान चिंचवड पुर्णानगर मधील मेगा हाईट्समध्ये असलेल्या भवानी मार्केट नावाच्या दुकानात झाली.

याप्रकरणी दुकानाचे मालक भेराराम डुंगाजी चौधरी (वय ५४, रा. सेक्टर नं.१८, शिवयोग अपार्टमेंट, शिवतेजनगर, चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भेराराम चौधरी यांचे चिंचवड पुर्णानगर मधील मेगा हाईट्स नावाच्या इमारतीत भवानी मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेदहाच्या सुमारास भेराराम हे त्यांचे दुकान व्यवस्थित लॉक करुन घरी गेले होते. मात्र अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लॉक तोडून आणि शटर उचकटून दुकानात प्रवेश करत आपण सीसीटीव्हीमुळे पकडले जाऊ म्हणून सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर दुकानातील तांदळाच्या पिशव्या, सिगारेटची पाकीट आणि रोख रक्कम ४१२०० असा एकूण १ लाख ६ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. निगडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.