चिंचवडमध्ये तरुणाला जबर मारहाण करुन टवाळखोरांची परिसरात दगडफेक

1053

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – ‘काय रे तुझी लय नाटक चालु आहेत’, असे बोलून एका तरुणाला तिघांनी जबर मारहाण करत परिसरात दगडफेक करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.१४) रात्री पावनेबाराच्या सुमारास चिंचवड अजंठानगर येथील तिरंगा हौसिंग सोसायटी येथे घडली.

रमेश मोहन इंगवले (वय २८, रा. बिल्डींग नं.ए/१, रुम नं.४११, तिरंगा हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार गणेश रघुनाथ बनसोडे (रा. अशोक हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड), आदेश संजय गायकवाड आणि सुशांत सुभाष गायकवाड (दोघेही, रा. तक्षशीला हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश हे शुक्रवारी रात्री पावनेबाराच्या सुमारास चिंचवड अजंठानगर येथील तिरंगा हौसिंग सोसायटी जवळ थांबले होते. यावेळी गणेश याने ‘काय रे तुझी लय नाटक चालु आहेत’ असे म्हणून रमेश याच्या डोक्यात लांकडी दांडक्याने वार केला. तसेच एमएच/१४/सीएक्स०९१८ या कारमधून आलेल्या आदेश आणि सुशांत या दोन आरोपींनी रमेशवर आणि परिसरात दगडफेक करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तिघा आरोपींनी परिसरातील नागरिकांना मारण्याची धमकी देऊन पसार झाले. या घटनेमध्ये रमेश गंभीर जखमी झाले. पोलिसांनी गणेश, आदेश आणि सुशांत या तिघांवरही गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.