चिंचवडमध्ये टीव्हीचा आवाज मोठा करुन एकाची आत्महत्या

577

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – कुटूंबीयांना समजूनये म्हणून एका ४१ वर्षीय इसमाने टीव्हीचा आवाज मोठा करुन राहत्या घरात ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. ३०) रात्रीच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे घडली.

उमेश शिंदे (वय ४१, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उमेश शिंदे हे त्यांच्या कुटूंबीयांसोबत घराबाहेर गप्पा मारत बसले होते. त्यानंतर अचानक उमेश घरात गेले आणि आतून दरवाजा बंद केला. कोणाला आत्महत्या करत असल्याचे समजूनये म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला आणि छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटूंबीय गप्पा संपवून घरात येत असताना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना समजले. त्यांनी बराच वेळ उमेश यांना आवाज दिला मात्र आतून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना उमेश यांनी आत्महत्या केल्याचे समजले. त्यांनी तातडीने उमेश यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.