चिंचवडमध्ये आय.टी.आय शिक्षीत तरुण निघाला अट्टल चोर; सात गुन्ह्यांचा उलगडा; २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त

806

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – सांगवीत चालत्या दुचाकीवरुन महिलेची पर्स हिसकावून फरार आरोपीचा शोध घेत असताना एका खबऱ्या मार्फत पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना माहिती मिळाली कि त्याचे नाव सुनिल परमगोळ असून तो शनिवारी (दि.४) भोसरी परिसरात येणार आहे.

यावर नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांनी युनिट ४ च्या पोलिस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करुन भोसरीत सापळा रचून सनिल सिध्दराम परमगोळ (वय २०, स.रा. गवते वस्ती, चाकण मु.रा. कलप्पवाडी, ता. अक्कलकोट) या तरुणाला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगवी परिसरात एक, एम.आय.डी.सी परिसरात दोन, भोसरी परिसरात एक, चाकण परिसरात दोन आणि लोणीकाळभोर परिसरात एक असे एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तब्बल २ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये दुचाकी आणि मोबाईला समावेश आहे. चोरी केल्यानंतर तो त्याची दुचाकी त्याच्या मुळ गावी अक्कलकोटला नेऊन ठेवत होता यामुळे तो बरेच दिवस पोलिसांपासून बचावत होता. दरम्यान सनिल याचे आय.टी.आय शिक्षण झाले असून देखील तो चोरी करत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.