चिंचवडमधून देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसांसह तरुणाला अटक

841

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि.२३) सकाळी नऊच्या सुमारास चिंचवड येथील काळभोरनगरमध्ये असलेल्या स्टार बाजार समोर केली.

अमिन अब्बीर शेख (वय २७, रा. डब्ल्यू.एक्स.रुम नं.३, श्रमिकनगर, ओटा स्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सकाळी गस्त घालत असताना त्यांना एका खबऱ्या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली कि, अंगात पांढरा शर्ट परिधान केलेला, दाढी वाढवीलेला इसम अॅक्टीव्हा मोपेडवर काळभोरनगर येथील स्टार बाजार समोर येणार असून त्याच्या जवळ पिस्तूल आहे.  पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून तेथे संशयितरित्या उभ्या असलेल्या आरोपी अमिन शेख  याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतूसे आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल, काडतूसे आणि एक मोपेड दुचाकी जप्त करुन अमिन शेख याला अटक केली आहे. पिंपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिश कांबळे अधिक तपास करत आहेत.