चिंचवडमधील चाफेकर चौकात ट्रकला अचानक आग; शॉर्ट सर्किटमुळे घडला प्रकार

236

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) –  चापेकर चौकातून खेड-शिवापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत ट्रक जळून खाक झाला. ही घटना आज (शनिवारी) दुपारी सव्वादोनच्या सुमारास चाफेकर चौक पुलावर घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेड-शिवापूरवरुन माल घेऊन आलेला ट्रक पिंपरीतील एका कंपनीत माल खाली करून आज (शनिवारी) दुपारी खेड-शिवापूरच्या दिशेने चालला होता. दुपारी सव्वादोनच्या सुमारास चापेकर चौकातील पुलावरुन जात असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ट्रकला अचानक आग लागली. आग लागल्याने ट्रकचा टायर फुटून धुराचे लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती.

दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनेची माहितीमिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी १५ काही काळातच आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आग लागलेला ट्रक जळून खाक झाला आहे.