चिंचवडमधील एकाला ऑनलाईन माध्यमाव्दारे पावने दोन लाखांचा गंडा

96

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – बँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून, एटीएम कार्ड ब्लॉक झाले असल्याचे नाटक करत कार्ड नंबर आणि ओटीपी नंबर विचारुन एका अज्ञात व्यक्तीने चिंचवडमधील एकाला तब्बल १ लाख १९ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना सोमवारी (दि.२३ जुलै) दुपारी पावनेचार ते पाचच्या दरम्यान चिंचवड येथे घडली.

हिंदुराव बर्गे (वय ५२, रा. चिंचवड) असे गंडा घालण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी निगडी पोलिस ठाण्यात फोन करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी फिर्यादी हिंदुराव बर्गे हे चिंचवड येथील त्यांच्या राहत्या घरी होते. यावेळी दुपारी पावनेचार ते पाचच्या दरम्यान त्यांना एका अनोळखी इसमाने फोन करुन बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तसेच त्याने बर्गे यांचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले असल्याचे सांगून ते चालू करण्यासाठी त्यांच्या कडील एटीएम कार्डचा नंबर आणि ओटीपी नंबर विचारुन घेतला. यानंतर आरोपीने बर्गे यांच्या बँक खात्यातील तब्बल १ लाख १९ हजार रुपये परस्पर काढून घेऊन त्यांची फसवणूक केली. निगडी पोलिस तपास करत आहेत.