चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाला दणका; गरीब रुग्णाला बिलासाठी डांबून ठेवल्याप्रकरणी सीईओ आणि रुग्णालयावर गुन्हा दाखल

7538

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणून डांबून ठेवल्याने रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे, त्यांचा भाऊ राजेश दुबे आणि बिर्ला रुग्णालयातील बाऊंसर तसेच रुग्णालयावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इच्छेविरोधात डांबून ठेवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे तसेच सामुहिकरित्या गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रुग्णालयाने डांबून ठेवलेल्या रुग्णाचा मुलगा संजय दशरथ आरडे (वय ३८, रा. कैलासनगर, पाण्याच्या टाकीजवळ, पिंपरी, मूळ रा. चिलवडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यांचे वडील दशरथ शिवाजी आरडे (वय ७२) यांना पिंपरी येथील राहत्या घरी ६ ऑगस्ट रोजी अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे त्यांना सुरुवातीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णाला दाखल करताना उपचारासाठी सुरूवातीला दहा हजार रुपये भरण्यात आले. उपचारानंतर दशरथ आरडे यांना ११ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने दशरथ आरडे यांच्यावरील उपचारापोटी ८६ हजार ५८३ रुपयांचे बिल त्यांच्या हातात ठेवले. आरडे कुटुंबिय गरीब असल्यामुळे त्यांना एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपण दारिद्य्र रेषेखालील असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाला सांगितले. कायद्याने आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत उपचार करणे आदित्य बिर्ला रुग्णालयाला बंधनकारक आहे. रुग्णालय व्यवस्थापनानेही त्याबाबतचा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावलेला आहे. त्यामुळे आरडे कुटुंबियांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली.

आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याचे कागदोपत्री पुरावे देऊनही दुबे यांनी त्यांना उपचाराचे संपूर्ण बिल भरावे लागेल, असे सांगितले. वारंवार विनंती करूनही दुबे यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे संजय आरडे यांनी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. त्यांना घेऊन ते रुग्णालयात गेले असता रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांना रुग्णाला भेटू दिले नाही. तसेच रुग्णाला जेवणही दिले जात नव्हते. रुग्णाला भेटण्याचा प्रयत्न केल्यास तेथे सुरक्षेसाठी ठेवलेले बाऊंसर यांनी आरडे यांना धक्काबुक्की केली. गेल्या दहा दिवसांपासून हा सर्व प्रकार सुरू होता.

अखेर आरडे यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांसोबत धर्मादाय आयुक्ताकडे धाव घेतली. धर्मादाय आयुक्ताने सर्व वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांच्याशी संपर्क साधला. रुग्ण आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे पुरावे असून, रुग्णाला डिस्चार्ज देण्यास सांगितले. तसेच याबाबत वाकड पोलिसांनाही कळविण्यात आल्याने त्यांनी दुबे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दुबे यांनी बुधवारी (दि. २२) सकाळी अकरा वाजेपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येईल, असे धर्मादाय आयुक्त व वाकड पोलिसांना आश्वासन दिले.

प्रत्यक्षात त्यांनी रुग्णाला डिस्चार्ज दिला नाही. संजय आरडे यांनी दुपारपर्यंत वाट पाहून वडिलांना डिस्चार्ज न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख, लोकशाही संस्थेचे अध्यक्ष अजय लोंढे, ग्राहक हक्क संघर्ष समिती अध्यक्ष अमोल उबाळे, नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या महिला अध्यक्षा संगीता शहा, रिपब्लिकन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भारत मिरपगारे, सामाजिक कार्यकर्ते रवि भोसले, अंजना गायकवाड, मल्लाप्पा याड्रमी, जितू गिल यांच्यासह वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर वाकड पोलिसांनी आदित्य बिर्ला रुग्णालय, रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे, त्यांचा भाऊ संजय दुबे आणि बाऊंसर विरोधात दशरथ आरडे यांना इच्छेविरोधात डांबून ठेवणे, जाणीवपूर्वक दुखापत करणे तसेच सामुहिकरित्या गुन्हा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वाकड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश दत्तात्र्य माने तपास करत आहेत.