चार राज्यांसह लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्यास सक्षम – ओ.पी. रावत

361

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान या चार राज्यांसह डिसेंबरमध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होणार असतील, तर निवडणूक आयोग  एकत्रित  निवडणूक घेण्यास सक्षम आहे. एकत्रित निवडणूक घेण्यात कुठलीही समस्या नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी म्हटले आहे.  

२०१९ मध्ये एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्याबाबत  चर्चा सुरु आहे.  देशात एकत्रित निवडणुका घेण्याची मागणी सत्ताधारी भाजपने लावून धरली  आहे. याबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला पत्र लिहून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. याबाबत रावत यांना विचारले असता सध्याच्या परिस्थितीत देशात एकत्रित निवडणूक घेणे शक्य नसल्याचे म्हटले होते.

मात्र, योजनाबद्ध पद्धतीने अंमलबजावणी केल्यास अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभेच्या निवडणुका घेणे शक्य होईल.  त्यासाठी कायद्यात दुरूस्ती कऱण्याची आवश्यकता आहे, असे रावत यांनी म्हटले होते. देशात यापूर्वीच्या चार निवडणुका एकत्रित झाल्या आहेत. पुरेशा प्रमाणात मशीन्स आणि सुरक्षा पुरवली, तर एकत्रित निवडणुका घेणे  शक्य आहे, असेही ते म्हणाले होते.  दरम्यान, संपूर्ण देशात एकत्रित निवडणुका घ्यायच्या असतील, तर त्यासाठी घटनेत दुरूस्ती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही रावत यांनी स्पष्ट केले आहे.