चार राज्यांची डोकेदुखी वाढली

105

पिंपरी, दि.२० (पीसीबी) : देशात लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकलेल्या नागरिकांचा घरी परतण्याचा मार्ग केंद्र शासनाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोकळा केला. मात्र इतर राज्यातून परतणारे नागरिक कोरोनाचे वाहक ठरत असल्याने चार राज्यांची डोकेदुखी वाढली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान व ओडिशा या चार राज्यात परतलेले नागरिक कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे समोर येत आहे. परतलेल्या कामगारांची तपासणी करणे, त्यांना क्वारंटाईन करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे व त्यांना आपल्या मूळ गावी परतण्याची सोय करणे, यामुळे या चारही राज्यांची प्रशासकीय पातळीवर कसोटीच लागली आहे.

लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेले लोकांना घरी परतण्याची योजना २९ एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केली. इतर राज्यात अडकलेल्या लोकांना परत आणण्यापूर्वी त्यांचे स्क्रिनिंग केल्यावर ज्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळणार नाही, अशा लोकांनाच परतण्याची परवानगी देण्यात आली. आपल्या राज्यात परतल्यावर त्यांना क्वाॅऱंटाईऩ व्हावे लागणार व कोरोनाची लक्षणे तपासण्यासाठी त्यांची नियमितपणे तपासणी करावी लागणार , असे केंद्र शासनाने निश्चित केले होते. विविध राज्यांमध्ये लाखो प्रवासी कामगारांनी कोरोनाची लक्षणे नसल्याबाबत डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट घेत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यात परतायला सुरुवात देखील झाली. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरातून तर अनेक प्रवासी कामगार पायी चालतच आपल्या मूळ गावी निघाले. काही राज्यांनी अशा कामगारांना राज्याच्या हद्दीपर्यंत सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था केली, तर काही कामगार माल वाहतुकीच्या ट्रकच्या माध्यमातून तसेच असंख्यजण रिक्षा, सायकल, टेंपो असे मिळेल त्या वाहनाने आपल्या राज्यात परतू लागले.

बिहारमध्ये सुमारे साडेपाच लाख कामगार परतले आहेत व त्यापैकी किवळ ८ हजार ३३७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६५१ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून बिहारमध्ये परतलेल्या या कोरोना पॉझिटिव्ह कामगारांपैकी २६ टक्के कामगार हे दिल्ली वरून परतले आहेत, तर १२ टक्के पश्चिम बंगाल वरून, ११ टक्के महाराष्ट्रातून, ९ टक्के हरियाणातून आणि ७ टक्के गुजरातमधून परतले आहेत. बिहार मध्ये पुढील आठवड्यापर्यंत १० लाख लोक परतण्याची शक्यता आहे. १ मे रोजी बिहार मध्ये केवळ ४२५ कोरोन बाधित रुग्ण होते व प्रवासी कामगार परतल्यानंतर दि १९ मे रोजी पर्यंत हा आकडा तिप्पटपेक्षा जास्त म्हणजे १ हजार ५१९ इतका झाला आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये १ मे रोजी २ हजार ६२५ कोरोन बाधित रुग्ण होते व प्रवासी कामगार परतल्यानंतर दि १९ मे रोजी पर्यंत हा आकडा दुप्पट झाला असून आता तिथे ५ हजार ४६५ इतका झाला आहे. राजस्थानमध्ये १ मे रोजी २ हजार ५८४ कोरोन बाधित रुग्ण होते व प्रवासी कामगार परतल्यानंतर दि १९ मे रोजी पर्यंत हा आकडा दुप्पट झाला असून आता तिथे ५ हजार ८४५ इतका झाला आहे. त्या पाठोपाठ ओडिशा मध्ये १ मे रोजी केवळ १४३ कोरोन बाधित रुग्ण होते व प्रवासी कामगार परतल्यानंतर दि १९ मे रोजी पर्यंत हा आकडा सातपटीने वाढला असून आता तिथे ९७८ कोरोना पॉझिटिव इतका रुग्ण आहेत.

इतर राज्यातून परतलेल्या कामगारांची तपासणी अवघे २ ते ३ टक्के इतकीच झालेली आहे. तसेच लाखोंच्या संख्येने परतणाऱ्या कामगारांना केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे इंस्टिट्युशनल क्वारंटाईन करावे लागत असल्याने बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान व ओडिशा सारख्या राज्यांना डोकेदुखी ठरू लागले आहे. तसेच बाहेरून आलेल्या कामगारांना आपल्या मूळ गावी प्रवेश करण्यावरून होणारा स्थानिक विरोध अशा कामगारांच्या समोरील अडचणी अधिकच वाढू लागले आहे.

WhatsAppShare