चाकण हिंसाचार प्रकरणी आणखी ११ जणांना अटक

550

चाकण, दि. ४ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकण येथे करण्यात आलेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी पोलिसांनी आणखी ११ जणांना अटक केली आहे. आज (शनिवारी) या सर्वांना खेडच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलै रोजी खेड तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे समोर आले होते. चाकण येथील हा संपूर्ण प्रकार आवाक्यात आणण्यात पोलिसांना मोठा त्रास झाला होता. यासंपूर्ण आंदोलनादरम्यानच्या काळातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत पोलिस या आंदोलनात तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाई करत आहे.

याआधी पोलिसांनी ३ अल्पवयीन आरोपींसह एकूण  १८ जणांना अटक केली आहे. त्यापैकी १५ जणांना ८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एकूण ४ ते ५ हजार जणांविरोधात जाळपोळ आणि हिंसाचारात शासकीय व खासगी वाहनांचे नुकसान तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे असलेल्या फुटेजच्या आधारे पोलिस संशयितांना ताब्यात घेत आहेत. पोलिस तपास करत आहेत.