चाकण हिंसाचार प्रकरणी अटकसत्र सुरु; २० जण पोलिसांच्या ताब्यात; १०० हून अधिक आंदोलकांची ओळख पटली

469

चाकण, दि. २ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे सोमवारी (दि.३० जुलै) झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरोधात पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी (दि.१) रात्री २० जणांना ताब्यात घेतले आहे. तर १०० हून अधिक आंदोलकांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये चाकण येथे कामासाठी आलेले, झोपडपट्टी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना आज (गुरुवार) पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे  हिंसाचारात सहभागी असलेल्या सुमारे ४ ते ५ हजार जणांवर सामूहिक गु्न्हा दाखल करण्यात आला होता. आंदोलकांनी येथे वाहनांची तोडफोड करीत जाळपोळही केली होती. यामध्ये ३० बस जाळण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पोलिसांकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा यात समावेश आहे. या हिंसाचारा दरम्यान १० कोटींचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.