चाकण येथे गोडाऊनमध्ये ठेवलेला सव्वा चार लाखांचा माल चोरट्यांनी केला लंपास

267

चाकण, दि. २ (पीसीबी) – गोडाऊनचे शटर उचकटून त्यामध्ये ठेवलेले एकूण सव्वा चार लाख रुपयांचे ७३२ नग असेमली स्टेशनर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. ही चोरी शुक्रवार (दि. ३१) दुपारी साडेचार ते शनिवार (दि.१) सकाळी सात वाजण्याचा दरम्यान चाकण येथे घडली.

याप्रकरणी गोडाऊनचे मालक विजयन नारायणन नायर (रा. भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर यांचे चाकण येथे टाटा कंपनीचे असेमली स्टेशनरचे गोडाऊन आहे. तेथे त्यांनी ७३२ असेमली स्टेशनर ठेवले होते. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नायर यांनी गोडाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरटयांनी गोडाऊनचे शटर उचकटून गोडाऊनमध्ये ठेवलेले ४ लाख ११ हजार २१० रुपये किमतीचे ७३२ असेम्ब्ली स्टेशनर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. शनिवारी सकाळी नायर यांनी गोडाऊन उघडल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. चाकण पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.