चाकण येथील तरूणाचा अनैतिक संबंधातून खून

2749

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – मोशी येथील संत ज्ञानेश्वर रूग्णालयात शुक्रवारी (दि. १४) रात्री दाखल करण्यात आलेल्या गंभीर जखमी अवस्थेतील तरूणाचे अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. जखमी तरूणाला रूग्णालयात दाखल करणाऱ्या चार तरूणांनीच त्याचा खून केल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणाचा एमआयडीसी भोसरी पोलिसांना १२ तासाच्या आत छडा लावण्यात यश आले. 

नामदेव नागोराव जाधव (वय २८, डोंगरगाव, निघोजे चाकण) असे खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

याप्रकरणी अविनाश उर्फ अविराज रोहीदास देडे (वय २२. रा. आदर्शनगर, मोशी) अक्षय सोनवणे, अदित्य मुऱ्हे, महादेव भाग्यवंत, आकाश गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सोनवणे याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीबरोबर मयत नामदेव याचे प्रेमसंबंध होते. या रागातून अविनाश देडे यांने आपल्या साथीदारांच्या मदतीने नामदेव याला शुक्रवारी दुपारी अडीच्या सुमारास   चाकण-आळंदी रस्त्यावरील रूडाई माता मंदिराजवळील गायरानात काठीने मारहाण केली. या मारहाणीत नामदेव गंभीर जखमी झाला.

त्याला मोशी येथील संत ज्ञानेश्वर रूग्णालयात शुक्रवारी रात्री अविनाश यांने दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले.  याची माहिती मिळताच पोलिसांनी रग्णालयात येऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात अविनाश हा पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आविनाश याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांने खून केल्याची कबुली दिली.

या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस उपनिरिक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार अजय भोसले, रविंद्र तिटकारे, संदीप भोसले, संजय भोर, किरण काटकर, गणेश जगदाळे, नवनाथ पोटे, विजय दौंडकर, प्रसाद कलाटे, अमोल निघोट, करन विश्वासे, विशाल काळे करत आहेत.