चाकण नगरपरिषद सीईओंच्या “डिमांड” मुळे ठेकेदार त्रस्त ?

454

चाकण, दि. ५ (पीसीबी) – चाकण नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलम पाटील यांच्या वाढत्या “डिमांड” मुळे छोटे – मोठे ठेकेदार त्रस्त झाले आहेत. नीलम पाटील यांनी विधानसभा निवडणुक आचारसंहिते पासून सर्वच ठेकेदारांची बिले रोखली असून काहीना काही खुसपट काढत ठेकेदारांना बेजार करत आहेत.

नवनिर्मित चाकण नगरपालिकेच्या सीईओपदी नीलम पाटील सुमारे दोन वर्षांपुर्वी रुजु झाल्या. पहिल्या दिवसापासुनच  त्या वादग्रस्त ठरल्या. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असो अथवा नगरसेवक त्यांचे कोणाचेच पटले नाही. त्यातच आगाऊ कार्यशैलीमुळे त्या वादग्रस्त बनल्या. अधिकारी, कर्मचाऱ्यांना कस्पटासमान लेखणाऱ्या पाटील यांच्यामुळे प्रशासनही त्यांच्यामागे नाही. ना अधिकारी,ना पदाधिकारी पाठिशी असल्याने त्या एकाकी पडल्या आहेत.

वाढत्या नागरिकीकरणामुळे चाकणमधील मुलभूत सोयी सुविधांवर कमालीचा ताण येत आहे. याचा पुरेपुर फायदा घेत नीलम पाटील यांनी सीमाभिंत बांधणी, डांबरीकरण, ब्लॉक टाकणे, नालाबांधणी यांसह स्थापत्यविषयक कामांची कंत्राटे स्वत:च्या अधिकारात ठेकेदारांना बहाल केली. त्याचे लेखी पत्र ठेकेदारांकडे आहे. केलेल्या कामांची बीले वेळेवर मिळतील, नीलम पाटील दिलेला शब्द पाळतील अशी ठेकेदारांना अपेक्षा होती.

तथापि, नीलम पाटील आता शब्द फिरवत आहेत. ठेकेदारांची सुमारे दोन कोटी रुपयांची बीले त्यांनी रोखुन धरली आहेत. विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता जारी झाल्यापासून त्यांनी ठेकेदारांना सतवायला सुरुवात केली आहे. सध्या त्या आजारपणाची सबब सांगुन बेमुदत रजेवर गेल्या आहेत. डेंग्युसदृश्य आजार आणि उच्चरक्तदाब अशी कारणे त्या पुढे करत आहेत. प्रदिर्घ रजेवर गेलेल्या नीलम पाटील कोणाचाही फोन उचलत नाही की मेसेजला प्रतिसादही देत नाही. त्यामुळे अधिकारी, पदाधिकाऱ्यांबरोबरच ठेकेदारही मेटाकुटीला आले आहेत. बीलांच्या फाईल्स त्यांच्या टेबलावर पडुन असून “डिमांड” मुळे ठेकेदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे नीलम पाटील यांची तक्रार करण्याबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्याचा निर्धार ठेकेदारांनी केला आहे.

 

 

WhatsAppShare