चाकण, एमआयडीसी भोसरी, वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचे चार गुन्हे दाखल

105

वाकड, दि. १९ (पीसीबी) – चाकण, एमआयडीसी भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनयभंगाच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील एमआयडीसी भोसरी येथील एका घटनेत महिलेसह तिच्या आठ वर्षीय मुलीचा देखील विनयभंग करण्यात आला आहे.

हितेश वसंत चव्हाण (रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. महिला एकटी घरात असताना आरोपी हितेश महिलेच्या घरात गेला. पती कुठे गेला अशी विचारपूस केली. त्यावर पती कामाला गेला असल्याचे महिलेने सांगितले असता हितेश याने घराची कडी लावून महिलेशी गैरवर्तन केले. महिलेने आरडाओरडा केला असता तिचे पती घरी आले. त्यावेळी पतीला ढकलून देत आरोपी हितेश पळून गेला. याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आशिष जोशी (पूर्ण नाव माहिती नाही. रा. मोशी) याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सोसायटी मधील एका फ्लॅटच्या केबल कापल्यामुळे एक महिला विचारपूस करण्यासाठी आली असता आरोपीने महिलेला शिवीगाळ करून महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात एक महिला आणि तिच्या आठ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. पीडित महिला घराबाहेर गेल्यानंतर त्यांचा कॅमेरा फुटला. त्याबाबत त्यांनी सोसायटीमधील आरोपींना विचारणा केली. त्यावरून आरोपींनी महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केली. त्यानंतर महिला आणि तिच्या आठ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी दिली.

अक्षय विजय निकम (वय 25, रा. जय भवानी चौक, रहाटणी) याच्या विरोधात एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने पीडित महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. महिलेला रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबत विचारणा करून कोकणे चौक, वाकड येथे महिलेचा जबरदस्तीने हात धरून त्यांचा विनयभंग केला.

WhatsAppShare