चाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी;  पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास

190

चाकण, दि. १९ (पीसीबी) – मोबाईलचे दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचे एकूण १५ मोबाईल चोरुन नेले आहेत. ही घटना गुरुवार (दि.१६ ऑगस्ट) रात्री साडेदहा ते शुक्रवार (दि.१७ ऑगस्ट) सकाळी ७ च्या दरम्यान चाकणगावच्या मार्केटयार्ड जवळ असलेल्या हरीओम मोबाईल शॉपीमध्ये घडली.

याप्रकरणी दुकान मालक भोला नंदलाल गुप्ता (वय २८, रा. वाफगाव चौक, मार्केटयार्डजवळ, चाकण, मु.रा. सलकापुर, ता. पालीया, जौनपुर, उत्तरप्रदेश) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुप्ता यांचे चाकणगावच्या मार्केटयार्ड जवळ हरीओम नावाचे मोबाईल विक्रिचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते दुकान बंद करुन घरी गेल्या नंतर काही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचे एकूण १५ मोबाईल चोरुन नेले. याप्रकरणी गुप्ता यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.